मुंबई मध्ये कोरोना प्रादुर्भावाचा (Coronavirus) धोका कमी होत असला तरीही नागरिकांना दक्षता पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे आता मुंबई मधील संभाव्य कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांना देखील वेग आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे सीरम इन्स्टिट्युट कडून मुंबई महानगर पालिकांच्या हॉस्पिटलमध्येही मानवी चाचण्या सुरू आहेत. आज (26 ऑक्टोबर) पासून केईएम हॉस्पिटलमध्ये (KEM Hospital) ज्या व्हॉलेंटिअर्सचा लसींचा पहिला डोस देऊन 28 दिवसांचा टप्पा पूर्ण झाला आहे त्यांना आता दुसरा डोस दिला जाणार आहे. आतापर्यंत सुमारे 100 जणांना केईएम मध्ये लस देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये केईएम सोबतच मुंबई सेंट्रल जवळील नायर हॉस्पिटल मध्येही कोविशिल्ड लस दिली जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत लस देऊन अभ्यास केला जाणार आहे. तर आता कोविशिल्डचा दुसरा डोस दिल्यानंतर त्या स्वयंसेवकांचा अभ्यास केला जाणार आहे. ही चाचणी नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाईल.
केईएम मध्ये 26 सप्टेंबर पासून लस देण्यास सुरूवात झाली. 20 - 45 वयातील 3 जणांना दुसर्या टप्प्यातील लस देण्यात आली होती. त्यापाठोपाठ 28 सप्टेंबर पासून नायर हॉस्पिटलमध्येही कोविशिल्ड ची मानवी चाचणी सुरू झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्राझील मध्ये ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या मानवी चाचणीत सहभागी एकाचा मृत्यू झाला होता. मात्र या लसीच्या चाचण्या कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई मधील 163 स्वयंसेवकांवर AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine चे प्रतिकूल परिणाम नाहीत- BMC.
दरम्यान पुण्याची सीरम इंस्टिट्युट या ऑक्सफर्ड, अॅस्ट्राझेनेका लसीच्या उत्पादनाची बाजू सांभाळत आहे. भारतासह जगातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या देशांना बिल गेट्स फाऊंडेशन आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या मदतीने लस पोहोचवण्याचं काम सीरम करणार आहे. त्यासाठी कोट्यावधी लस बनवण्याचं काम सुरू झालं आहे.