COVID-19 Vaccination In Maharashtra: गडचिरोलीच्या धानोरा मध्ये कोविड 19 लसीकरणाबाबत  गैरसमजातून नागरिकांनी वळवली पाठ; 45 वर्षांवरील अवघ्या 40 जणांनी घेतली लस
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Oxford Twitter)

भारतामध्ये कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आणि आगामी तिसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न करताना कोविड 19 प्रतिबंधात्मक लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्या अनुषंगाने आता सरकार कडून देशातील लसीकरण मोहिम वेगवान केली जात आहे. पण अजूनही अनेकांच्या मनात किंतू-परंतू असल्याने समाजातील मोठा वर्ग या लसीकरणाकडे पाठ वळवत आहे. महाराष्ट्रात गडचिरोली मधील धानोरा तहसील गावात नागरिक अशाच प्रकारे लसीकरण मोहिमेकडे पाठ वळवत असल्याचं चित्र आहे.

ANI सोबत बोलताना आयुष कर्मचारी सदाशिव मंडावर यांनी दिलेल्या प्रतिक्रिये मध्ये दिलेल्या माहितीमध्ये सध्या या गावात 45 वर्षांवरील केवळ 40 जणांचे लसीकरण झाले आहे. गावकर्‍यांची अशी धारणा आहे की त्यांनी लस घेतली तर ते मरतील. 18 वर्षांवरील नागरिकांनी लस घेतली तर ते नपुंसक होतील. दरम्यान आयुष कर्मचारी अअणि आरोग्य सेवक त्यांचा अनुभव लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अगदी निरोगी असल्याचं देखील सांगत लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गावकर्‍यांच्या मते, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सामान्य नागरिकांना वेगवेगळी लस दिली जाईल. त्यामुळे आता या गावामध्ये विविध स्तरातुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृतीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

ANI Tweet

दरम्यान लसीकरणाबाबत सुरूवातीला अनेकांच्या मनात भीती होती. समज-गैर समज होते पण लस ही सुरक्षित आहे. सरकारी यंत्रणांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन वापरासाठी परवानगी पूर्वी त्याची सुरक्षितता आणि प्रभाव या दोन्हींचे अहवाल संपूर्ण अभ्यासून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोविड 19 शी सामना करण्यासाठी शस्त्र म्हणून कोविड 19 ला पाहिले जात असल्याने ज्यांना जशी आणि जी कोविड 19 ची लस मिळेल ती घेणं हे आवश्यक आहे.

भारतामध्ये सध्या कोविशिल्ड,कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी ही तिसरी लस उपलब्ध आहे. 18 वर्षांवरील सार्‍यांना लस दिली जात आहे.