COVID Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये लवकरच सोसायट्यांमध्येच थेट मिळणार कोविड 19 ची लस; 'या' असतील अटी!
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

मुंबई मध्ये महानगर पालिकेकडून काही दिवसांपूर्वी दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी ड्राईव्ह ईन व्हॅक्सिनेशन सेंटर (Drive In Vaccination Center) दादर मध्ये सुरू केल्यानंतर आता बीएमसी सोसायट्यांमध्ये लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यासही सज्ज झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बीएमसीच्या (BMC)  या नव्या प्रकल्पाची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढणार असल्याचे आणि नागरिकांचे हाल कमी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या सोसायटी आणि जेथे हॉल आहे. वातावरण थंड राहू शकतं. नर्स, डॉक्टरांची फौज असेल आणि कार्डिएक अ‍ॅम्ब्युलंस असेल अशा सोसायट्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करता येईल. यासाठी नागरिक पालिका प्रशासनाकडे अर्ज करू शकतात. त्यानंतर पालिकेचे अधिकारी जागा पाहून नंतरच त्याला परवानगी देणार आहेत. मोठ्या सोसायट्या खाजगी हॉस्पिटल सोबत करार करून लसीकरण मोहिम राबवू शकतात. Double Masking: मास्क 'डबल', धोका 'हाफ'! म्हणत BMCचा मुंबईकरांना डबल मास्क घालण्याचा सल्ला; पहा ट्वीट.

येत्या काही दिवसांत जसजसा लसींचा साठा मोठ्या संख्येने उपलब्ध होणार आहे तशी ही सोसायट्यांमधील लसीकरण केंद्रांची मोहिम वाढणार आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मुंबईमध्ये अनेक लसीकरण केंद्रांवर लांब रांगेत उन्हात उभं रहावं लागत आहे. यामध्ये कोरोना प्रसाराचाही धोका वाढत आहे तसेच नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून हा सोसायट्यांमधील लसीकरण केंद्रांचा विचार आहे.

देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी सध्या उपलब्ध आहेत. केंद्र सरकार 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करत आहे तर राज्य सरकार 18-44 वयोगटातील नागरिकांना लस देत आहे. हा लसीकरणाचा कार्यक्रम खाजगी रूग्णालयांत सशुल्क तर सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू आहे. यासाठी कोविन अ‍ॅप वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मर्यादित लोकांना प्रतिदिन लस टोचली जात आहे.