
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यातच पुणे (Pune) येथील सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल (Sardar Vallabhai Patel Cantonment General Hospital) मध्ये अन्नाचा दर्जा खालावला असल्याची तक्रार कोरोना बाधित रुग्णांनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णाने अन्नाच्या दर्ज्याबाबत तक्रार केली आहे. अन्नाचा दर्जा खालावलेला असून त्यात केस मिळणे हे सामान्य आहे. मात्र आज (गुरुवार, 23 एप्रिल) डाळीत अळी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (COVID19: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; मुंबई, पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत आणखी भर)
रिपोर्टनुसार, या रुग्णालयात बेचव आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे. मात्र कोणताही पर्याय नसल्याने मिळले ते खावे लागत असल्याचे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांनी सांगितले. सध्या या हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित 25 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
या सर्व प्रकाराबद्दल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, "रुग्णांना उत्तम दर्जाचे अन्न दिले जाते. स्वच्छतेची काळजी घेऊन कमी तेल, मसाले आणि मीठ वापरुन रुग्णांसाठी अन्न शिजवले जाते. तरी देखील अन्नात अळी मिळाल्याच्या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष घातले जाईल आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल."
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात रुग्णसंख्येच्या आकडेवारी पुण्याचे दुसरे स्थान आहे. पुण्यात सध्या 805 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या संसर्गातून 152 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर 57 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.