Corona Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण प्रारंभ, 285 केंद्रांवर यंत्रणा सज्ज
Corona Vaccination | Representational Image (Photo Credits: Pixabay

कोरोना व्हायरस लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेस राज्यात आजपासून (शनिवार, 16 जानेवारी 2021) सुरुवात (Corona Vaccination Begining in Maharashtra) होत आहे. या लसीकरणासाठी राज्यभरात सुमारे 285 केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवरील तयारीही पूर्ण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. प्रतिकेंद्र 100 या प्रमाणे सुमारे 28 हजार 500 आरोग्य कर्मचारी या लसीरकरण (Covid-19 Vaccination in Maharashtra) मोहिमेत सहभागी होतील. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे लसीकरण पार पडेल, असेही डॉ. व्यास यांनी म्हटले आहे.

संदेशप्राप्त व्यक्तीलाच लस घेता येणार

कोरोना लस देण्यात येणाऱ्या व्यक्तींना शुक्रवारी (15 जानेवारी 2021) सायंकाळ पर्यंत मेसेज पाठविण्याचे काम सुरु होते. ज्या व्यक्तींना मेसेज प्राप्त झाले आहेत त्यांनाच कोरोना लस घेता येणार आहे. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला कोणत्या केंद्रावर किती वाजता आणि कोणत्या कंपनीची लस दिली जाणार आहे याची नेमकी माहिती देण्यात आल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

राज्यातील दोन रुग्णालयांतून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

डॉ. प्रदीप व्यास यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, प्रत्येकी एका लसीकरण केंद्रावर एकूण 5 जणांचे एक पथक तैनात असेल. मुंबई येथील कूपर हॉस्पिटल आणि जालना जिल्हा रुग्णालय अशा दोन ठिकाणाहून महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या शुभारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेणार आहेत. त्यासाठी या दोन्हीही ठिकाणी दूरचित्रवाणी संवाद यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. (हेही वाचा, Coronavirus Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कोरोना व्हायरस लस टोचून घ्यावी- वंजित बहुजन आघाडी)

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्राला ला कोव्हीशिल्ड लसीचे 9.63 लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लसीचे 20,000 डोसेस मिळाले आहेत. पूर्व नियोजनाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत ही लस पोहोचविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील 6 ठिकाणी कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. ज्या ठिकाणी कोव्हॅक्सीन लस लस देण्यात येईल त्यात मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर येथील 4 वैद्यकीय आणि पुणे आणि अमरावती येथील प्रत्येकी 1 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण पार पडेल.