राज्य आणि देशातील सर्वांना उत्सुकता असलेली कोरोना व्हायरस लस ( Corona Vaccine) अखेर वैज्ञानिकांनी शोधून काढली. ही लस आता देशभरातील विविध राज्यांमध्ये पोहोचवली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या परिणामकतेबाबत निर्माण असलेले प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. त्यामुळे ही लस पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टोचून घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमादरम्यान वंचित बहुज आघाडीचे (VBH) नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ही मागणी केली. देशभरातील विविध राजकीय पक्षांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस प्रथम टोचून घ्यावी अशी मागणी केली आहे.
कोरोना व्हायरसवर प्रभावी लस निर्मितीसाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत होते. यात भारती संशोधकांना लस निर्मीती करण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला. भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) या दोन्ही संस्थांनी ही लस निर्मिती केली. या लसीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही. परंतू, आपात्कालीन काळात ही लस वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. द्यामुळे कोवॅक्सीन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) अशा दोन्ही लस देशभरात वितरीत केल्या जात आहेत. (हेही वाचा, Bharat Biotech-Serum Institute Joint Statement : भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील भांडण मिटले; संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा)
प्राप्त माहितीनुसार, देशभरातील विवध राज्यांना ठरवून दिलेल्या कोठ्यानुसार कोरोना लसीचे डोस वितरीत केले जात आहेत. महाराष्ट्रालाही विशिष्ट डोस उपलब्ध झाले आहेत. कोरोना लसीचे हे डोस सुरुवातीला अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर मग सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरस लसीकरणासाठी नागरिकांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यात संबंधितांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र पाहिले जाईल. ज्या व्यक्तीला लस दिली जाईल त्या व्यक्तीस साधारण अर्धा तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत हे लक्षात आल्यानंतरच संबंधित व्यक्तीस घरी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. लसीकरणादरम्यान गोंधळ होऊ नये यासाठी लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.