Bharat Biotech-Serum Institute Joint Statement : भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील भांडण मिटले; संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा
Coronavirus Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस लस (Coronavirus Vaccine) निर्मीतीबाबत भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) यांच्यात सुरु झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. या वादामुळे कोवॅक्सीन (Covaxin) विरुद्ध कोविशिल्ड (Covishield) असा सामना पाहायला मिळत होता. निर्माण झालेल्या वादावर दोन्ही संस्थांनी संयुक्तरित्या एक पत्रक प्रकाशित करुन पडदा टाकला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला (Adar Poonawalla) आणि भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला (Krishna Ella) या दोन्ही अधिकाऱ्यांनी आज (मंगळवा, 4 जानेवारी 2021) संयुक्तरित्या हे पत्रक प्रकाशित केले. या पत्रात दोन्ही संस्था देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत कोरना व्हायरस लस पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपासून दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर दोषारोप आणि टीका टीपण्णी करण्यात येत होती. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अवघ्या देशासह जगभरातील अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले होते. या पत्रकात पुढे म्हटले आहे की देशात दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही दोन्ही संस्था मिळून पहिल्यासारखेच देशहितासाठी काम करत राऊ. (हेही वाचा, England Lockdown: इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, Coronavirus संकटामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची घोषणा)

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला मंजूरी मिळताच सीरम इन्स्टीट्यूटच्या अदार पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी केवळ ऑक्सफर्ड, मॉडर्न आणि फायजर यांचीच लस सुरक्षीत असल्याचे म्हटले होते.

अदार पूनावाला यांच्या प्रतिक्रियेनंतर भारत बायोटेकच्या कृष्णा इल्ला यांनी म्हटले होते की, त्यांना अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. करतो आहोत. परंतू, जर कोणी आमच्या लसीला पाणी म्हणत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. आम्हीही वैज्ञानिक आहोत आम्हीही काम केले आहे.

दोन्ही संस्थांच्या वादविवादानंतर एकूण लसीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे दोन्ही संस्थांवर टीकाही होऊ लागली होती. दरम्यान, हा वाद पुढे अधिक न वाढवता दोन्ही संस्थांनी शहाणपणा दाखवत संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा टाकला आहे.