महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus 3rd Wave) ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. कारण याच दरम्यान बहुतेक सण संपतात. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले की, या कालावधीत किमान 60 लाख लोक कोविड-19 आजाराला बळी पडू शकतात. एप्रिलमध्ये कोरोनामुळे राज्यात लादलेले निर्बंध गेल्या आठवड्यात शिथिल करण्यात आले. सध्या सिनेमा हॉल आणि धार्मिक स्थळे बंद आहेत, तर मॉल आणि दुकाने चालवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. सणांमुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीही वाढत आहे. राज्य आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहे व त्याची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती.
कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
कोविड-19 च्या संभाव्य लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1367.66 कोटी रुपयांची तरतूद केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे, यात केंद्राचा हिस्सा 820.77 कोटी रुपये तर राज्य शासनाचा हिस्सा 547.18 कोटी रुपयांचा आहे. कुशल-अकुशल मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे, यंत्रसामुग्री, कोविड चाचणीसाठी आवश्यक किट्स, लहान मुले व नवजात शिशुंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात येत आहेत. (हेही वाचा: Ganeshotsav 2021: गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था- डॉ. विपीन शर्मा)
लहान मुले, नवजात शिशुंसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या 21 रुग्णालयांत 32 खाटांचे अतिदक्षता कक्ष उभारण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज येथेही अतिदक्षता कक्ष उभारण्यात येणार आहे. 36 ठिकाणी 42 खाटांचे नवजात शिशु व लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष बनविण्यात येणार आहेत, त्यात कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आणि इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 6 खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात येणार असून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये देखील 20 खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.