गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाही कोविड-19 चे संकट कायम असल्याने सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याचबरोबर सणांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठाण्यातही गणेशोत्सवानिमित्त फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिली. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांमुळे गर्दी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहारातील प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि स्वीकृती केंद्रही तयार करण्यात येणार आहेत. ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकी कृत्रिम व्यवस्था निर्माण करण्यात येईल. याशिवाय निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच ही सर्व व्यवस्था सुरळीत राबवण्यासाठी स्वयंसेवक देखील नेमण्यात येणार आहेत.
याशिवाय विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तसंच विसर्जनापूर्वीची आरती भाविकांनी घरीच करावी, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2021: 'गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा'- ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आवाहन)
दरम्यान, मागील वर्षीपासून सुरु झालेल्या कोरोना संकटामुळे गणेशोत्सव साजरे करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले होते. तसंच भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी विशेष सुविधा, व्यवस्था करण्यात आल्या होत्या. यंदाही कोरोनाचे संकट कायम असल्याने या व्यवस्था नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.