Tambdi Jogeshwari Ganpati | Image used for representational purpose only | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण, गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यंदा 10 सप्टेंबर रोजी या उत्सवाला सुरुवात होईल. मात्र गेल्या दीड वर्षांपासून देशावर कोरोना विषाणू संसर्गाचे सावट आहे. या संसर्गाची अजून दुसरी लाट उतरतेय ना उतरतेय तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. अशात गणेशोत्सव हा अगदी सध्या पद्धतीने साजरा करावा असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच सरकारने यंदाच्या गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत व आता ठाणे महापालिकेच्यावतीने त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या आधीचे काही महिने मूर्तिकारांसाठी महत्वाचे असतात. याच काळात ते सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणपतीच्या मूर्ती बनवत असतात. आता सरकारने कोरोनाचे संकट पाहता, मूर्तींच्या उंचीसह इतर निर्बंध जारी केले आहेत. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फुट असावी, असे सांगण्यात आले आहे.

मार्गदर्शक सुचना -

  • सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणारणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.
  • महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यामध्ये भपकेबाजी नसावी.
  • गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूटांची आणि घरगुती गणपतीकरीता 2 फूटांची असावी.
  • यंदा पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती जर का शाडूची असेल तर त्याचे विसर्जन शक्यतो घरी करावे. ते शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
  • जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.
  • राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवादरम्यान यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. (हेही वाचा: ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत 4 जुलै पर्यंत संचारबंदी लागू)
  • आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी. तसेच तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • गणपतीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था असावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
  • श्रींचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरी करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ व्यतीत करावा.
  • संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये.
  • महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.