कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी प्रसंग कोणताही असो नागरिकांनी गर्दी टाळायलाच हवी. मग तो प्रसंग दुख:द निधन, दहावे, बारावे, लग्न असो की इतर कोणताही धार्मिक विधी. गर्दी नकोच. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लोक दारात मांडव घालून लग्न करत आहेत. कृपा करुन असे प्रकार टाळा. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राज्य सरकार, पोलीस या सर्वांचे आदेश, सूचना यांचे पालन करा, असे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister) यांनी केले आहे. अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी पुणे विभागिय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी हेही या वेळी उपस्थित होते.
नागरिकांनी गर्दी करुन प्रशासनावरील ताण टाळावा
नागरिकांनी कोणत्याही स्थितीत गर्दी करणे टाळायला हवे. कोरोना व्हायरस नक्की नियंत्रणात येईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वेळोवेळी जनतेला मार्गदर्शन करत आहेत. राज्यातील पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासनातील कर्मचारी चांगले काम करत आहेत. त्यांच्यावर गर्दी करुन किंवा इतर कोणत्याही कारणास्तवर गर्दी करुन ताण वाढवू नये, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.
नागरिकांनी सहकार्य करावे
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे उभा राहायला हवे. राज्यातील बस, लोकल सेवा सुरु आहेत. या केव्हाही बंद करता येऊ शकतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेतही दिले आहेत. पण, सरकार जाणीवपूर्वक हा निर्णय टाळत आहे. उद्देश इतकाच की सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करावे. कोणत्याही स्थितीत गर्दी टाळा. (हेही वाचा, Coronavirus: लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात; नवरा-नवरी सूटले, सासू-सासू-सासरे आणि व्याह्यांना अटक, माजलगाव येथील घटना)
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना निर्णयाचे अधिकार
राज्य पातळीवर राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला असेल. परंतू, स्थानिक पातळीवर काही वेगळा निर्णय घेतला जाण्याची आवश्यकता असेल. तर तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिले असल्याचेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले.
मालकांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एखादा कर्मचारी कामावर आला नाही. तसेच, कर्मचाऱ्यांना कंपनी, दुकान मालकांनी सुट्टी दिली असेल. तर, कर्मचाऱ्याचे वेतन मालकांनी कापू नये. मानवतेचा दृष्टीकोन ठेऊन कंपनी मालक आणि प्रशासनाने वर्तन करावे असे अवाहन अजित पवार यांनी या वेळी केले.
दरम्यान, कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता राहणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी आर्थिक निर्बध हटविण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस हा केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही येऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही गर्दी टाळावी, काळजी घ्यावी असे अवाहन अजित पवार यांनी केले.