कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि जिल्हाधिकारी (Collector) यांचे आदेश न पाळल्यामुळे एका जोडप्याची लग्नाच वरात थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. सासू-सासरे आणि व्याह्यांसह चुलता-चुलती आणि लग्न लावायला आलेल्या भटजींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. माजलगाव (Majalgaon) शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथे ही घटना घडली. येथे एका विवाहासाठी दुपारी 12.30 वाजणेच्या सुमारास नातेवाईक मोठ्या प्रमाणावर जमली होती. त्यांची संख्या 100 पेक्षाही अधिक होती. या सर्वांनी पोलिसांचे आदेश न पाळल्याने पोलिसांनी कारवाई करुन संबंधितांना ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथे एका ठिकाणी विवाह संपन्न होत असल्याची माहती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन माजलगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर, त्या ठिकाणी 100 पेक्षाही अधिक नातेवाईक एकत्र येऊन विवाह समारंभ आटोपत होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जमावंबदीचे आदेश दिले आहेत. तसेच, सार्वजनिक कार्यक्रम करण्यासही बंदी घातली आहे. या आदेशाला डावलून या ठिकाणी विवाह समारंभ आयोजित केल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या शहर पोलिसांच्या सूचनाकडे दुर्लक्ष करुन ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी विवाह कार्यक्रम सुरुच ठेवला. त्यामळे पोलिसांनी पुन्हा पुन्हा विनवनी केली. मात्र, तरीही नातेवाईकांनी ऐकले नाही. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची जाणीव करुन देत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. (हेही वाचा, 'पॅनिक होऊ नका' म्हणत नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास टिप्स (Watch Video))
पोलिसांनी नवरा-नवरी, सासू-सासरे, काका-काकी, व्याही आणि इतर नातेवाईकांना ताब्यात घेतेले आणि पोलीस स्टेशनला नेले. पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पाठिमागे उरलेल्या मोजक्या नातेवाईकांनी कसेबसे लग्न आटोपून घेतल्याची चर्चा आहे.