महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांची काळजी देखील वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. राजकीय नेते, सेलिब्रेटी यांच्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. यात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही उडी घेतली आहे. तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत कोरोनाशी सामना करण्यासंबंधित माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस विरुद्ध युद्ध आता सुरु झालं आहे. सुरक्षित रहा. सुरक्षित अंतर ठेवा, स्वच्छता पाळा आणि पॅनिक होऊ नका, असं म्हणत तुकाराम मुंढे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. वैज्ञानिकरित्या हात स्वच्छ कसे धुवावेत हे त्यांनी या व्हिडिओतून स्पष्ट केले. तसंच कमीत कमी 40 सेकंद हात धुणे गरजेचे असून हात वारंवार धुतले गेले पाहिजेत. हात स्वच्छ धुतल्याशिवाय नाक-तोंड, डोळ्यांना स्पर्श करु नका. विशेष म्हणजे मास्क वापरण्याची काहीच गरज नाही, असेही त्यांनी ठळकपणे सांगितले. सॅनिटायझर वापरण्यापेक्षा साबण वापरला तरी चालेल, अशी माहिती त्यांनी 4 मिनिटांच्या व्हिडिओतून दिली आहे.
तुकाराम मुंढे ट्विट:
War against #COVID has just begun. Stay safe, keep safe distance, maintain sanitation & don’t Panick https://t.co/xuKU8yehE8
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) March 20, 2020
तसंच गर्दीचं ठिकाण टाळा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा, असेही तुकाराम मुंढे यांनी या व्हिडिओतून सांगितले. (मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 52 झाला असल्याने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनाश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.