Coronavirus: शरद पवार यांनी कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याबाबत सरकारला दिला ट्विटरवरुन सल्ला
Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे शिक्षण संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणींवर ट्विटरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. कोरोना व्हायरस संकटामुळे राज्याची आणि देशाची शिक्षण प्रक्रिया विस्कळीत होऊ नये, यासाठी एक अभ्यास समिती नेमण्यात यावी असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकासआघाडी स्थापन झाली. पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीचा घटक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सत्तेत आहे.

शरद पवार यांनी आपल्या @PawarSpeaks या ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या @OfficeofUT या कार्यालयीन ट्विटर हँडलला टॅग करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी सद्यास्थितीबाबत चर्चा केली. कोविड 19 संदर्भात राज्यातली परिस्थिती, प्रशासनासमोरील आव्हाने आणि विविध विभागांना दिलासा देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आदींबाबत मी खालील विषयांवर माझ्या काही सूचना दिल्या आहेत.

शरद पवार यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कोविड 19 आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे पुढील शैक्षणिक वर्षास उशीर होईल. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या यांवर त्याचा गंभीर परिणाम होईल. तसेच, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान संस्थांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.(हेही वाचा, Coronavirus: भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल)

शरद पवार ट्विट

दरम्यान, आर्थिक नुकसान झाल्यामुळे काही शैक्षणिक संस्थांची यंत्रणा कोसळण्याची किंवा बंद पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना इजा होणार नाही आणि शैक्षणिक प्रक्रिया विस्कळीत होणार नाही यासाठी वेळेवर उपाययोजना करण्यासाठी सरकारने अभ्यास गट किंवा समिती नेमली पाहिजे, अशी सूचनाही शरद पवार यांनी ट्विटरद्वारे केली आहे.