मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका विचारात घेऊन मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये तसेच, कोरोना व्हायरस (Coronavirus) संभाव्य संसर्ग टळावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईतील ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे.
मुंबई शहरातील जलतरणतलाव, सिनेमागृहं, मॉल्स आणि प्रार्थनास्थळं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने या आधीच दिले आहेत. मुंबई शहरापाठोपाठ पुण्यातही जलतरणतलाव, सिनेमागृहं, मॉल्स आणि प्रार्थनास्थळं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत जमावबंदी आदेशही देण्यात आला आहे. दरम्यान, अंगणवाड्या आणि इतर शाळांनाही सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास पुण्यात जमावबंदी आदेशही देण्यात येणार आहेत. (हेही वाचा, Coronavirus: मुंबईकरांना दिलासा! मुंबई लोकल बंद होणार नाही; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती )
दरम्यान, देशभरातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस बाधित नागरिकांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पुणे शहर आणि त्यापाठोपाठ मुंबईमध्ये कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यानंतर नागपूर आणि इतर शहर/जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
पीटीआय ट्विट
Mumbai police order closure of orchestra/dance bars, discotheques, pubs, live bands and DJ performances in city till March 31 in view of coronavirus threat
— Press Trust of India (@PTI_News) March 17, 2020
राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संक्रमीत रुग्णांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 138 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमण झाले आहे. देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार कोरोना व्हयारस नियंत्रणासाठी अधिक गंभीर आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये व सामाजिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे 31 मार्च 2020 अखेर अंबाबाई ( महालक्ष्मी मंदिर) कोल्हापूर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. दरम्यान देवीचे सर्व दैनंदिन नित्य विधी देवीचे श्रीपूजक यांचे कडून सुरु राहणार असल्याचे अंबाबाई पूजक प्रशासनाने म्हटले आहे.