Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला नाही तर लादण्यात येऊ शकतो अंशिक Lockdown; पालकमंत्री असलम शेख यांचे संकेत
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत असून शहरात नवीन रुग्णांची संख्या मागील चार महिन्यांत उच्चांकावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकार मुंबईत लॉकडाऊनचा (Lockdown) विचार करीत आहे. परंतु हे लॉकडाऊन 2020 च्या लॉकडाउनसारखे नसून, टप्प्याटप्प्यामध्ये लादले जाऊ शकते. शहराचे पालकमंत्री असलम शेख (Guardian Minister Aslam Shaikh) यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की जर येत्या 10 दिवसांत संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात आली नाहीत, तर आंशिक लॉकडाउन लागू केले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, त्यांनी मुंबईत संक्रमणाचे प्रमाण सप्टेंबरच्या पातळीवर पोहोचण्याची चिंता व्यक्त केली आहे.

वृत्तानुसार, अस्लम शेख म्हणाले की, वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वप्रथम प्रयत्न करेल, यासाठी मॅरेज हॉल आणि पबमधील गर्दीवर भारी दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, संस्थात्मक आयसोलेशनच्या पर्यायाचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, चाचण्यांची संख्या वाढल्यास लसीकरण कार्यक्रम व्यापक प्रमाणात वाढवता येईल. मात्र जर संसर्गाची प्रकरणे सतत वाढत राहिली तर आंशिक लॉकडाउन लादले जाऊ शकते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी सांगितले की, मुंबईत अतिरिक्त निर्बंध लादण्याची कोणतीही योजना नाही, मग तो लॉकडाउन असो किंवा रात्री कर्फ्यू असो. मुंबईमध्ये लहान घरे असल्याने जे लोक घरीच आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्याबाबतीत अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. तसेच अशा रुग्णांमुळे संसर्ग वाढण्याचाही धोका वाढला आहे. म्हणून सरकार सध्या रुग्णांना संस्थात्मक आयसोलेशनमध्ये थावण्याचा विचार करीत आहे. (हेही वाचा: Coronavirus: मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत 8,83,100 रुपयांचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची माहिती)

दरम्यान,  मुंबईमध्ये काल 1360 रुग्णांची नोंद झाली आहे. काल 1020 रुग्ण बरे झाले असून, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 10,731 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमधील एकूण रुग्णसंख्या 333564 इतकी झाली आहे. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे मुंबई जिह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्के आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 231 दिवस आहे.