Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला तरी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. वेळीच उपचार केले तर हा आजार जीवघेणा नाही. आपल्याकडील आकडेवारीपैकी मृत्यूदराचे प्रमाण काढले तर ते अगदीच कमी आहे. या आजारावर औषध नाही. परंतू लक्षणानुसार उपचार केले जातात. आजवरचे कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे एकूण प्रमाण पाहिले तर ते मोठे आहे. अगदी 90 वर्षांवरील व्यक्तींनीही कोरोना व्हायरस (Covid 19) संकटावर मात केली आहे. जर योग्य उपचार घेतल्यावर आपण मरणार नाही याची खात्री असेल तर मग कोरोना व्हायरस संसर्ग झाला तरी घाबरायचं कशाला? असा बिनधास्त सवाल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र डीजीआयपीआरने आपल्या @MahaDGIPR ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समाजसेवक शांतीलाल मुथ्था हे राजेश टोपे यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. या संवादात राजेश टोपे कोरोना व्हायरस संसर्गाबाबत माहिती देत आहेत.

राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, भीती पोटी लोक मोठ्या चुका करत आहेत. लोकांची मानसिकता खराब झाली आहे. वयाच्या 80 वर्षे वयाच्या पुढचे पाच हजार लोक , 90 वर्षे वयवर्षापूढील 500 ते 600 लोक बरे झाले आहेत. 100 वर्षे वयाच्या पुढचे 5 ते 7 लोक बरे झाले आहेत. कोरोना व्हायरस संसर्ग कोणालाही होतो. लहान मुलांनाही होतो. पण कोरोना झाला तरी तो बराही होतो. त्यामुळे कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण पाहिले तर 97 टक्के लोकबरे झाले आहेत. आज कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे प्रमाण 3% इतके आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस झालेले उपचार घेऊन परतलेले आणि लक्षण दिसले असे एकूण प्रमाण बघीतले तर एक हजारमध्ये एक टक्के इतकेही मृत्यूचे प्रमाण नाही. माणूस घाबरतो कशाला तर मरणाला. जर आपण मरणारच नाही हे आपल्याला कळले तर मग घाबरायचं कशाला? असे राजेश टोपे या वेळी म्हणाले. ( Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 83,809 नव्या रूग्णांची भर एकूण कोरोनाबाधित 49 लाखांच्या पार)

कोरोना व्हायरस संसर्गाबाबत लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. लोक चाचणी करुन घ्यायला घाबरत आहेत. लोकांना असे वाटत आहे की, जर आपण चाचणी करुन घेतली तर आपल्याला कोरोना व्हायरस झाल्याचे निष्पन्न होईल. कोरोना झाला तर आपला मृत्यू होईल. कोरोनाला औषधही नाही, अशी भीती लोकांच्या मनात आहे, असा सवाल शांतीलाल मुथ्था यांनी विचारला होता. मुथ्था यांच्या उत्तरादाखल राजेश टोपे बोलत होते.