Coronavirus: मुंबई येथे IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण एकट्या मुंबई (Mumbai) शहरात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसह आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच मुंबई येथील मंत्रालयाजवळील यशोधन इमारतीत राहणाऱ्या आयएएस महिला अधिकारी (IAS) यांना कोरोनाती लागण झाली आहे. तसेच या महिला अधिकारी यांच्या संपर्कात आल्याने त्यांचे पती आयपीएस अधिकारी (IPS) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित अधिकारी इमारतीच्या ज्या मजल्यावर राहत होते, तो मजला पूर्णपणे सील केला आहे.

यशोधन इमारतीत अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी राहत असून पालिकेने इमारत सील करण्याऐवजी मजला सील केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून या इमारतीतून कुणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक वस्तूंची गरज भासल्यास त्या बाहेरून आणून देण्यात येणार आहे. पुढील 14 दिवसांत कुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क करावा, असे आवाहनही मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच ती वेळ, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसपासून दूर रहावे अन्यथा त्यांचे राजकारण संपेल- सुब्रमण्यम स्वामी

महाराष्ट्र पोलिस खात्याने दिलेल्या माहितीनुसार 1 हजार 388 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात 948 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, 428 पोलिसांनी या आजारावर मात देखील केली आहे. मागील दोन महिन्यांपासून भारतामध्ये कोरोना विषाणू लॉकडाऊन आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीपासून क्वारंटाईन सेंटर ते नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात आता पोलिस कर्मचारी देखील अडकले आहेत.