Subramanian Swamy | (Photo Credits-Facebook)

भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackera) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरातील कोरोना व्हायरस संकटाचा विचार करता भारताने या संकटावर बऱ्यापैकी मात केली आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला हे संकट निटसे हाताळता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू केली जाऊ नये, असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिंक शेअर केली आहे. ही लिंक एका पोर्टलवर लिहिण्यात आलेल्या एका लेखाची आहे. या लेखात उल्लेख केलेल्या मुद्द्यांना सुब्रमण्यम स्वामी यांनी आपले समर्थन दिले आहे. या लेखाचा दाखला देत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. अन्यथा तीही वेळ निघून जाईल असेही स्वामी यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांनाही सल्ला दिला आहे की, उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबतची युती तोडली. आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाची साथ सोडावी अन्यथा हे दोन्ही पक्ष तुमचे राजकारण संपवून टाकतील, असा सल्लावजा इशाराही स्वामी यांनी ठाकरे यांना दिला आहे. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांनी कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याबाबत सरकारला दिला ट्विटरवरुन सल्ला)

ट्विट

पॉलिटीक्स गुरु नावाच्या एका वेब पोर्टलवर हा लेख लिहिण्यात आला आहे. या लेखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका न करता राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. या लेखामध्ये म्हटले आहे की, राज्याचे आरोग्य मंत्री असलेल्या राजेश टोपे यांनी या संकटाकडे गांभीर्याने पाहिले नाही. केंद्र सरकारने विमानसेवा बंद करेपर्यंत ते शांत बसून होते.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही या लेखातून टीका करण्यात आली आहे. देशमुख  यांनाही कोरोनाचे गांभीर्य फारसे कळले नाही. त्यांनी मुंबईत धारावी, गोवंडी यांसारख्या भागात योग्य ती दक्षता घेतली नाही. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राज्यातून परतणाऱ्या कामगारांविषयी काहीही व्यवस्थापन केले नाही. अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे हे पुरेसे पीपीई किट व साहित्य उपलब्ध करुन देण्यात कमी पडल्याचे या लेखात म्हटले आहे.