Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात वेगाने प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहेत. तसेच प्रत्येक नागरिकाने लॉकडाउनच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याच दरम्यान, काही दिवसांपूर्वी डीएचएफएल कंपनीच्या वाधवान कुटुंबियांसह अन्य काही सदस्यांनी लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास केल्याची बाब समोर आली. त्यावरुन विविध प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले होते.याच पार्श्वभुमीवर आता वाधवान कुटुंबियांना पाचगणी येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याचसोबत वाधवान कुटुंबीयांसह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाइनचा कालावधी संपला असला तरीही त्यांना 3 मे पर्यंत सातारा न सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. तसेच आता कपिल आणि धीरज वाधवान यांचा ताबा CBI ने घेतला आहे.

महाराष्ट्रात कायदा मोडणारी कोणतीही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वी वाधवान कुटुंबियांचा जामीन रद्द करण्यासाठी ED ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर वाधवान कुटुंबियांना प्रवास करण्यासाठी गृहखात्यामधील अमिताभ गुप्ता यांनी परवानगी दिल्याचे पत्र सुद्धा समोर आले होते. त्यामुळे गुप्ता यांची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. वाधवान कुटुंबियांचा ताबा आता CBI कडे देण्यात आला आहे.  त्याचसोबत सातारा पोलिसांना मिळालेल्या लिखीत विनंती मागणीवरुन  त्यांच्यासाठी सर्व आवश्यक सहाय्यता आणि  वाहनासोबत 1+3 गार्डची सोय मुंबई पर्यत केली आहे. (वाधवान कुटुंबाचा क्वारंटाईन कालावधी संपला; 3 मे पर्यंत सातारा न सोडण्याचा कोर्टाचा आदेश)

तर गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटर हेडवर वाधवान कुटुंबासाठी देण्यात आलेल्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा केल्याने विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. यावर मीडियाशी बोलताना सनदी अधिकार्‍यांच्या निलंबनासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो त्यामुळे चौकशी आणि सल्ला मसलत करून अमिताभ गुप्ता यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली होती.