लाच | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे, लाचखोरीच्या घटनांमध्ये (Bribe Cases)  लक्षणीय घट झाली आहे. या लॉकडाऊनचा सरकारी व निमशासकीय विभागांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. ज्यामुळे एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात लाचखोरीची फक्त 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात भ्रष्टाचार निरोधक ब्यूरोने (ACB) एका सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. या महिन्यात (14 मे पर्यंत) लाचखोरीबाबत केवळ पाच गुन्हे दाखल झाले आहेत. थोडक्यात लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रामधील भ्रष्टाचार कमी झाला आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लाचखोरीचे 58 गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामध्ये 77 आरोपींचा समावेश होता. तर मे महिन्यात 32 गुन्हे नोंदविण्यात आले, ज्यामध्ये 41 आरोपींचा समावेश होता. 2019 च्या या दोन महिन्यांची तुलना या वर्षाच्या महिन्यांशी केली गेली तर, एप्रिल 2020 मध्ये या प्रकरणांमध्ये 88 टक्के आणि मेमध्ये आतापर्यंत सुमारे 84 टक्के घट झाली आहे. यावर्षी जानेवारीपासून एसीबीने लाचखोरी प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्यभरात 211 सापळे रचले आहेत, ज्यात 290 हून अधिक सरकारी अधिकारी आणि इतर लोकांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राज्यात अशा 326 घटना घडल्या होत्या, ज्यात सुमारे 430 लोकांना अटक करण्यात आली होती. 2019 मधील याच कालावधीच्या तुलनेत जानेवारीपासून या प्रकरणांमध्ये एकूण 35 टक्क्यांहून अधिक घट झाली असल्याचे समजत आहे. पुण्याच्या वडगाव येथे सापळा रचलेली एकच अशी घटना घडली जी लॉकडाऊनशी संबंधित आहे. (हेही वाचा: येणाऱ्या काळातील लॉकडाऊनची आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक)

दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे सरकारने 31 मेपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महानगरपालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगांव ही ठिकाणे कोविड-19 हॉटस्पॉट्स (संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र) म्हणून समोर आली आहेत. या ठिकाणाचे लॉक डाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा मानस महाराष्ट्र सरकारने गुरुवारी व्यक्त केला.