येणाऱ्या काळातील लॉकडाऊनची आव्हाने, अर्थचक्र गतिमान करणे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक; शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांची उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: Twitter / ANI

मुख्यमंत्री सचिवालयाने (जनसंपर्क कक्ष) दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनची (Lockdown) सध्याची परिस्थिती आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे, याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून, केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे 55 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

राज्यात 20 एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता  आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. 65 हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून, 35 हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच 9 लाख कामगार रुजू झाल्याचेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर 50 टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच पार राज्यातील कामगार परत गेल्याने, उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली. (हेही वाचा: महाराष्ट्रात अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत छत्री, रेनकोटचाही समावेश; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय)

आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली.