CAA च्या समर्थनार्थ आज मुंबईत संविधान सन्मान मार्च
Representative Image: Photo Credits: Twitter/ ANI

नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) लागू झाल्यानंतर त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. मात्र आज मुंबईत संविधान सन्मान मंचच्या वतीने एका भव्य अशा संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संविधान मार्च आज संध्याकाळी 4 वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून निघेल. हा मार्चचे वैशिष्ट्य म्हणजे यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार यात अनेक दिग्गज नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानातून निघून हा मार्च गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी समाप्त होईल. या संविधान मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. तसेच यावेळी सुरेश हावरे, सुभाष कांबळे, रणजित सावरकर, अनंत पळशीकर, आमदार अतुल भातखळकर हे या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

हेदेखील वाचा- CAA Protests: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे जर्मन विद्यार्थ्याला सोडावा लागला भारत

नागरिकत्व दुरूस्ती कायदा (Citizen Amendment Act) भारतामध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर देशभरातून नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतातून या कायद्याला प्रखर विरोध करण्यात येत आहे. आता मात्र देशातील विविध भागातून याला विरोध करण्यात येत आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे इतके तीव्र पडसाद उमटले आहेत की हे विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये तसेच दिल्लीमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे, तीव्र पडसाद उमटले आहेत. या नव्या कायद्यानुसार, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांक धर्मियांना भारताचे नागरिकत्व घेता येणार असल्याची तरतूद आहे. परंतु, विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे.