BJP Mega Recruitment 2019: 'काँग्रेसमधील घाण गेली, आमची दिवाळी आजच साजरी झाली'; मुंबई टिळक भवन काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष
Congress Party workers celebrate at Mumbai Tilak Bhavan Congress office | (Photo Credits: twitter)

भाजप मेगा भरती 2019: मुंबई येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालय आणि परिसर आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने हटके ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपाचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात मोठा जल्लोष साजरा केला. 'काँग्रेस पक्षातील घाण स्वच्छ झाली', अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर, 'आमची दिवाळी आजच साजरी झाली. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील गद्दार बाहेर पडले', अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ केव्हाच हाती घेतले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नंतर आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर आणि इतर अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. या नेत्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस विचारांच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि राग आहे. काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्वेग बाहेर पडला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे पक्ष कार्यालय असलेल्या टिळख भवन येथे लाढू वाटून जल्लोष साजरा केला. या वेळी बरे झाले काँग्रेसमधील घाण बाहेर पडली, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, संदीप नाईक, वैभव पिचड आणि काँग्रेस पक्षातील कालिदास कोळंबकर यांच्यासह काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी आज भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेली अनेक दिवस सुरु असलेल्या चर्चेला आजच्या भाजप मेगा भरती 2019 च्या निमित्ताने अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यात आणि केंद्रात दिर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी आज (बुधवार, 31 जुलै 2019) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपाचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या भव्य पक्षप्रवेशाचा उल्लेख राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर भाजप मेगा भरती 2019 (BJP Mega Recruitment 2019) असा केला जात आहे. या पक्षप्रवेसामुळे आजचा दिवस हा भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. आजच्या पक्ष प्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील विरोधी पक्षांना प्रचंड मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार आहे. (हेही वाचा, BJP Mega Recruitment 2019: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचा BJP प्रवेश; पाहा यादी)

महाराष्ट्र काँग्रेस ट्विट

दरम्यान, भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप हे दबावाचे राजकारण करत असून, त्या माध्यमातूनच ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, भाजप हा कोणताही पक्ष फोडत नसून, भाजपचे विचार आवडल्याने इतर पक्षातील लोक स्वत:हून पक्षात आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत, असे म्हटले आहे.