महाविकासआघाडीमध्ये लोकसभा निवडणूक 2024 साठीचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. तेव्हापासून काँग्रेस (Congress) नेते माजी खासदार संजय (Sanjay Nirupam) निरुपम काहीसे नाराज आहेत. त्यांची ही नाराजी लपून राहिली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी मविआतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना (UBT) पक्ष आणि नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सुरु केले आहे. आज एका खासगी वृत्तवाहिणीला दिलेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचे खापरही त्यांनी राऊत यांच्यावरच फोडले. शिवसेना (UBT) खासदाराच्या नावाने खडे फोडताना त्यांनी या पक्षाचे मुंबईतील पाचही खासदार पराभूत होतील असे म्हटले.
संजय निरुपम काँग्रेसमध्ये पाठिमागील काही काळापासून नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. लवकरच ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि सत्ताधारी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. संजय निरुपम यांनी जाहीरपणे अजून तरी पक्ष सोडण्याबाबत वाच्यता केली नसली तरी आपल्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात निरुपम काँग्रेसचा पंजा सोडताना दिसले तर नवल वाटणार नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी पक्षात निरुपम प्रवेश करणार अशी चर्चा असली तरी, नेमके ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. बोलले जात आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा ते भारतीय जनता पक्षाचा अधिक विचार करतील. (हेही वाचा, Congress vs Shiv Sena-UBT: काँग्रेस नेत्याकडून शिवसेना (UBT) उमेदवाराचा 'खिचडी चोर' असा उल्लेख)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा आपण प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निरुपम यांनी व्यक्ती केली आहे. त्यामुळे महाविकासआगाडीसह अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अर्थात संजय निरुपम यांचे मुंबईतील एखादा मतदारसंघ किंवा काही भाग वगळता महाराष्ट्रातील इतर भागात त्यांचा फारसा प्रभाव नसल्याने त्यांच्या विधानाला राजकीय वर्तुळात फारसे गांभीर्याने घेतले गेल्याचे अद्याप तरी दिसत नाही.
संजय निरुपम हे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसतर्फे उमेदवार होते. त्या वेळी त्यांनी साडेतीन लाख मते घेतली होती. या निवडणुकीत निरुपम यांचा शिवसेना उमेदवाराने पाच लाख 70 हजार मते घेत पराभव केला होता. या जय-पराजयाबाबत बोलताना निरुपम यांनी दावा केला की, शिवसेना उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांपैकी जवळपास साडेतीन लाख मते ही भाजपची होती. आता तर शिवसेनाही फुटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे फारशी मतेच उरली नाहीत, असा निरुपम यांचा दावा आहे. सध्या ठाकरे यांच्याकडे किती मते आहेत याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचेही सांगतानाच काँग्रेसने महाविकासआघाडीचे जागावाटप करताना मुंबईतील पाचही जागा निरुपम यांना देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.