Comrade Govind Pansare Yuva Jagar 2019: भारताच्या अनोख्या बहुविविधतेची ओळख करून देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) युवाजागर शिबीर कोल्हापूर (Kolhapur) शहरानजीक पन्हाळा (Panhala) येथे 31 मे ते 2 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. श्रमिक प्रतिष्ठान (Shramik Pratishthan) आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी (Maharashtra Itihas Prabodhini Kolhapur) यांच्यावतीने आयोजित या शिबीराचे यंदा चौथे वर्ष असून, सहभागी होणार्या महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय विद्यार्थी-युवक-युवतींना ‘आपला भारत-बहुविध भारत’ या बीजविषयाशी संलग्न उपविषयांवर राज्यातील नामवंत विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पन्हाळा येथील संजीवन इंजिनियरिंग महाविद्याल येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार असून, ‘जागतिक व भारताच्या संदर्भात सांस्कृतिक बहुलवाद’ या विषयावर ते बीजभाषण करणार आहेत. तसेच ‘भाषा-साहित्य-संस्कृती : राजकीय सत्ता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरही स्वतंत्र सत्रात विवेचन करणार आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबीरात ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी ‘भारतातील हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन सहअस्तित्व’ या विषयावर, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे ‘पूर्वग्रह, परकेपणा आणि संवाद’ या विषयावर, ‘इंडियन जर्नल ऑफ सेक्युलॅरिझम’चे संपादक इरफान इंजिनिअर ‘ऐतिहासिक व भौगोलिक परिप्रेक्ष्यातून भारतीय बहुधार्मिकता’ या विषयावर, तिहेरी तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्या सामाजिक कार्यकर्त्या हसीना खान ‘भारतातील धर्म-जमातवाद आणि स्त्रिया’ या विषयावर, लेखिका श्रुती तांबे ‘भौगोलिक व सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून पितृसत्ताक व भारतीय स्त्री’ या विषयावर, अरूणाचल प्रदेश येथील संशोधक विद्यार्थीनी टर्बी लोयी ‘ईशान्य भारताचे सांस्कृतिक अनोखेपण’ या विषयावर, ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे ‘भारतीय जातवास्तव व विद्रोह’ या विषयावर, विद्रोही कवी वाहरू सोनवणे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस ‘आदिवासी संस्कृती-लोकसंस्कृती व भारत’ या विषयावर, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर ‘भारताचा स्वातंत्र्यलढा, बहुविधता व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक दिलीप बोरकर ‘गोवन संस्कृती’ या विषयावर आणि समाजविज्ञान अकादमीचे संस्थापक तथा ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई ‘जागतिकीकरण आणि 21 व्या शतकातील संस्कृती, बहुविधता व सहअस्तित्वाचा प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात विविध विषयांवर चर्चा व लघुपटांचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे. (हेही वाचा, निवडणूक कामांबाबत कामचुकार करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; कठोर कारवाईचे आदेश)
महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर शिक्षण घेणार्या विद्यार्थी, युवक, युवतींना या शिबीरात सहभागी होता येणार असून, यासाठी प्रत्येकी फक्त 300 रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये तीन दिवसांचे जेवण, नाश्ता व निवासाची सुविधा दिली जाणार आहे. तसेच सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. इच्छुकांनी सुशील लाड (मोबा. 8550931003) किंवा मल्हार पानसरे (मोबा. 9923290668) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.