गेल्या वर्षीच्या, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये जातीय दंगलींमध्ये (Communal Riots) झपाट्याने वाढ झाल्याची नोंद झाली आहे. 2023 च्या तुलनेत ही संख्या तब्बल 84% ने वाढली आहे. सेंटर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (CSSS) च्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जातीय दंगली घडल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा नंबर लागतो. CSSS ने 2024 च्या संपूर्ण वर्षात घडलेल्या जातीय दंगलींच्या घटनांचा डेटा संकलित केला आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वर्षभरात एकूण 59 जातीय दंगली झाल्या, ज्यात 2023 मध्ये नोंदवलेल्या 32 जातीय दंगलींपेक्षा 84% ने मोठी वाढ झाली आहे.
शिवाय, या अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक जातीय दंगली झाल्या असून वर्षभरात राज्यात 12 दंगली झाल्या. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येकी सात दंगली झाल्या. अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्र 2024 मध्ये जातीयवादी केंद्र म्हणून उदयास आले आहे. राज्यातील जातीय दंगली आणि मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तीन हिंदू आणि दहा मुस्लिमांसह 13 लोकांचा मृत्यू झाला.
अयोध्या राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जानेवारीत झालेल्या चार दंगली, सरस्वती पूजनानंतर सात, गणेशोत्सवानंतर चार आणि बकरी ईदच्या वेळी झालेल्या दोन दंगलींसह बहुतांश जातीय दंगली धार्मिक सण किंवा मिरवणुकीदरम्यान घडल्याचा दावा करण्यात आला आहे. एप्रिल/मे मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे जातीय दंगलींच्या संख्येत वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा: Santosh Deshmukh Murder Case: 'सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, 'गुंडाराज' खपवून घेणार नाही'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर CM Devendra Fadnavis यांचे वक्त्यव्य)
अहवालानुसार असेही म्हटले आहे की, जातीय दंगलींव्यतिरिक्त, वर्षभरात मॉब लिंचिंगच्या 12 घटना नोंदवण्यात आल्या, परिणामी एक हिंदू, एक ख्रिश्चन आणि आठ मुस्लिमांसह 10 मृत्यू झाले. यातील सहा लिंचिंगचा संबंध गोरक्षक किंवा गोहत्येच्या आरोपाशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात लिंचिंगच्या तीन घटना घडल्या, तर छत्तीसगड, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि कर्नाटकात एक घटना नोंदवली गेली.