Santosh Deshmukh Murder Case: महाराष्ट्रातील बीड (Beed) येथे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडने मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर आता या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे वक्तव्य समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बीडमध्ये 'गुंडाराज' खपवून घेणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आपण देशमुख यांच्या भावाशी दूरध्वनीवरून बोललो आणि या प्रकरणात त्यांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले. फडणवीस म्हणाले, कायदा हातात घेण्याचा किंवा रहिवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस फरार आरोपींचा पाठलाग करत आहेत. कुणालाही सोडले जाणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हा फरार झाल्याचा आरोप होता. कराडला अटक करण्यासाठी आमदारांनी मोर्चा काढला होता, त्यात सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदार आणि मराठा नेत्यांचाही समावेश होता.
जाणून घ्या काय आहे प्रकरण-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे खंडणीचे मोठे प्रकरण आहे. बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी वसूल केली जात होती. देशमुख यांनी या खंडणीला विरोध केला होता, त्यानंतर 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर चार आरोपींना अटक करण्यात आली. (हेही वाचा: Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट)
कराड यांच्यावरील आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘पोलीस संशयितांवरील आरोप आणि पुरावे याबाबत अपडेट देतील. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कोणत्याही बाह्य दबावाशिवाय करत आहे. कराड यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केली जात असल्याच्या आरोपावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, पुरावा असेल तर कुणालाही सोडले जाणार नाही. मात्र, मी या राजकारणात पडणार नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे… माझ्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.’