CM Uddhav Thackeray Statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला ऑफर की NCP, काँग्रेला इशारा? 'त्या' विधानावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अनेक तर्कवितर्कांना उधान आले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम ( Marathwada Mukti Sangram) दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी बोलताना भाषणाची सुरुवात करतानाच 'व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि सोबत आले तर भविष्यातील सहकारी' असे वाक्य मुख्यमंत्र्यांनी वापरले. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वेमंत्री, भजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विधान हे त्यांना उद्देशून होते का? मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला पुन्हा एकदा युतीची ऑफर दिली आहे काय? असे मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे अर्थ शोधणारे एक ना अनेक तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरु झाले आहेत.

पुणे येथील एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केला. त्यावर माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांनी पाहा, असे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी केढलेले उद्गार आणि लगेचच मुख्यमंत्र्यांनी केलेले आजचे विधान याचा संबंध लावत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरुन टाकलेला कटाक्ष राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवताना दिसतो आहे. (हेही वाचा, Sanjay Raut Criticizes Chandrakant Patil: 'हवेत गोळीबार करू नका' चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

व्हिडिओ

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दबावाचे राजकारण करताना दिसत असल्याचा सूरही उमटत आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरुन तिन्ही पक्षांच्या आमदार, मंत्र्यांमध्ये अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खडाखडी सुरु आहे. असा वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांना इशारा देण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले असावे असा अर्थ काढला जात आहे. मला भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, असेच एक प्रकारे मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीला सूचवत असल्याचे काही राजकीय अभ्यासकांचे म्हणने आहे.