मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असे ठाकरे सरकारमधील (Maha Vikas Aghadi) एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितले होते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.
संजय राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी भाष्य केले आहे. एक मंत्री कोण? हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगावे. हवेत गोळीबार करू नका. कोणी कोणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे देखील वाचा- Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू, आरोपी मोहन चौहान याला अटक
महाराष्ट्राच्या राजकारणात 25 वर्षांपासून भाजपचा मित्र असलेल्या शिवसेनेने पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, शिवसेना किती जागा लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष यूपीतील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशातील एकूण 403 जागांपैकी 100 जागा लढवणार आहोत.