मोठी बातमी! मुंबईतील हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
CM and PM (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी लाट शमविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात कोरोना लस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मुंबईच्या हाफकिन संस्थेस (Haffkine Institute) भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन (Covaxin) बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती समोर येत आहे. ही राज्यासाठी खूपच चांगली वार्ता आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले आहे.हेदेखील वाचा- CM Uddhav Thackeray Writes to PM Narendra Modi: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आता स्वबळावर कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसचं उत्पादन करणार आहे. राज्याला 24 कोटी लसची गरज आहे. त्यासाठी आता लसींचं उत्पादन वाढवणार आहे. हाफकिन संस्थेत महिन्याला 1 कोटी पर्यंत लसींचं उत्पादन करण्याची क्षमता आहे.

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 61,695 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 36,39,855 वर पोहोचली आहे. तर 349 नव्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 59,153 वर पोहोचला आहे.