CM Uddhav Thackeray (PC - ANI)

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील (Hinganghat Women Burn Case) आरोपीला शिक्षा देण्यात येईल. तसेच गुन्हा सिद्ध करुन आरोपीला लवकरात-लवकर फासावर लटकवू , अशी ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली होती. गेल्या आठवडाभरापासून पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. (हेही वाचा - हिंगणघाट: काय झाले याचा विचार करण्यापेक्षा यावर काय केले पाहिजे याचा विचार करायला हवा- आदित्य ठाकरे; 10 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला फासावर लटकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा पद्धतीचं कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही असा कठोर कायदा करू, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी पीडितेला श्रद्धांजली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.