CM Eknath Shinde On Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे पिता-पुत्रावर थेट प्रहार, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Eknath Shinde | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटावार जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नसला तरी प्रामुख्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर राहिले. आपल्या भाषणात त्यांनी मागच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विविध कामांसाठी काढलेल्या टेंडरची यादी वाचून दाखवली. या टेंडरच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत 'सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी' अशी उपहासात्मक टीकाही शिंदे यांनी केली.

'आदित्य कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस'

'आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला' अशी शब्दचमत्कृती साधत मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. याच वेळी आमच्यावरही टीका केली जाते. पण ही टीका करताना मर्यादेपर्यंत असावी, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. कोरोना काळात लोक भीतीच्या छायेत होते. लोक हतबल होते. असा काळात काही लोक पैसे खाण्यात मग्न होते. लोकांचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना खिचडी चोर, कफनचोर ही बिरुदावलीही कमी पडेल इतका भ्रष्टाचार या लोकांनी केला आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एक यादीच वाचून दाखवली. ज्यामध्ये कोरोना काळात विविध कामांसाठी काढण्यात आलेल्या टेंडर्स आणि ते टेंडर्स मिळवलेल्या कंपन्यांचा समावेश होता. (हेही वाची, CM Eknath Shinde On Disha Salian Case: दिशा सॅलियन प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना चिमटे, म्हणाले 'गलबत आणखी भरकटले')

'सबका मालिक एक'

शिवसेना (UBT) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रोमिन छेडा या प्याद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यात आला. ज्याची सुरुवात मुंबई येथील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. मोठे हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले गेले. त्याच कंपनीला पुढे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचेही काम दिले गेले. सर्वाचा एकही मलिक आणि सबका मालिक एक असे धोरण राबवूनच ही टेंडर्स देण्यात आली. एक एक महिन्याचे काम दाखवून विशिष्ट कंपन्यांनाच ही कामे देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हही वाचा, Aaditya Thackeray News: दिशा सॅलियन प्रकरण आणि SIT बाबत आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर 'भीतीतून बदनाम करण्याचे उद्योग')

'जिथे टेंडर तिथे सरेंडर'

आमच्यावर टीका करता हे ठिक आहे. पण एका मर्यादेपर्यंतच ठिक आहे. तुम्ही आम्हाला रोज शिव्या देणार, आमच्यावर टीका करणार पण तुमच्याही कामाचे मोजमाप केले जाणार आहे. सर्व गोष्टी पुराव्यानिशी पुढे येतील, असेही शिंदे यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर यांचा कारभार म्हणजे 'जिथे टेंडर तिथे सरेंडर' अशा प्रकारचा सुरु होता, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.