Aaditya Thackeray News: दिशा सॅलियन प्रकरण आणि SIT बाबत आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर 'भीतीतून बदनाम करण्याचे उद्योग'
Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

Aaditya Thackeray SIT Inquiry: दिशा सॅलियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव भाजप (BJP) आणि सत्ताधारी पक्षातील अनेक लोक सातत्याने पुढे आणत आहेत. त्यामुळे सहाजिकच एसआयटी चौकशीला आदित्य ठाकरे यांनाही सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे' अशी टीका आदित्य यांनी केली आहे. शिवाय हे सरकार येत्या 31 डिसेंबरला पडणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

'राज्य आणि केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर'

शिवसेना (UBT) पक्षाच्या युवा सेनेकडून 'स्वेट ऑन स्ट्रीट' कार्यक्रम गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या संवादावेळी ते म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करत आहे. राज्य सरकार तर घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे सरकार 31 डिसेंबरला जाणार म्हणजे जाणार. राज्यात सत्तेवर असलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या एफडी नक्कीच वाढविल्या असतील. मुंबईच्या विकासावर आमचे सतत लक्ष आहे. आम्ही मुंबई महापालिकेला दक्षिण मुंबईच्या रस्त्यांसंदर्भात दोन प्रश्न विचारले आहेत. मात्र, अद्यापही त्याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर)

'सरकार उत्तर देत नाही'

मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नव्हे ते देशाचे आर्थिक केंद्र आहे. या शहराची लूटालूट केली जात आहे. शहरातील प्रकल्पही प्रलंबीत राहात आहेत. खास करुन दहिसर, वरळी आणि इतरही अनेक ठिकाणेच्या प्रकल्पांची हिच अवस्था आहे. आम्ही सरकारला प्रश्न विचारत आहोत. सरकार आम्हाला उत्तर देत नाही. आम्ही पालिकेलाही प्रश्न विचारत आहोत. पालिकाही आम्हाला उत्तर देत नाही. एकूणच सगळा प्रकार लपवालपवीचा आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

'खोक्यांसाठी प्रकल्प रखडवले जात आहेत'

आदित्य ठाकरे यांन पुढे बोलताना म्हटले की, आमचे सरकार होते तेव्हा आम्ही कोणी कोणताही प्रश्न विचारला तरी आम्ही उत्तर द्यायचो. संंबंधीत प्रकल्पाशी संबंधित एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो. मार्ग काढायचो. पण आता तसे काहीच होत नाही. वरळी शिवडी कनेक्टर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास होणे आवश्यक होते. मात्र, तो अद्यापही झाला नाही. असे अनेक प्रकलप् आहेत. प्रश्न विचारले तर उत्तर मिळत नाही. आम्ही हे प्रश्न लाऊन धरणार आहोत. गरज पडल्यास ही लढाई कोर्टात घेऊन जाऊ. केवळ खोक्यांसाठी प्रकल्प रखडवले जात असल्याची टीकाही आदित्य यांनी यांनी या वेळी केली.