अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेबाबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उद्या, सोमवारी दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची ते भेट घेतील. सध्याच्या परिस्थितीबाबत, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीमुळे पीडित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी या बैठकीचे आयोजन केले गेले आहे. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री पदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांपैकी, दोन खाती शिवसेनेला द्यावीत याबाबत चर्चा सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबतचे सर्व वाद मिटवून  सरकार स्थापन केले जाईल, तसेच शिवसेनेबरोबर युती करून त्याची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये अनेक ट्विस्ट येत आहेत. रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी, शिवसेनेचे संजय राऊत यांचा आपल्याला एक संदेश आल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी शरद पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे संकेतही दिले होते.

(हेही वाचा: महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी राष्ट्रवादी कडून शिवसेनेला समर्थन मिळावे म्हणून नवा प्रस्ताव, केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद सोडण्याची गळ)

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय पुराणिक आणि व्ही सतीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या अमित शाह यांना भेटून पुढील रणनीती आखली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या सर्व बाबींना सकारात्मक प्रतिसाद दिला तर 7 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापनेची चर्चा पूर्ण होऊ शकते. दरम्यान, राष्ट्रवादीने आज शिवसेनेने पुढाकार घेतल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ असे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असल्याची माहितीही मिळत आहे.