मंत्री आशिष शेलार

नागपूर (Nagpur) जिल्ह्याचा स्वतःचा मोठा इतिहास आहे. जिल्हा जंगलांनी वेढलेला आहे. यासोबतच येथे पर्वत, नद्या आणि किल्ले आहेत. शेकडो वर्षे जुनी मंदिरे आजही श्रद्धेची केंद्रे आहेत. म्हणूनच हा परिसरात अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आता नागपूर जिल्ह्यात फिल्मसिटी (Film City) उभारण्याबाबत चर्चा सुरु आहे. फिल्म सिटी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक येथे उपलब्ध आहेत. म्हणूनच जिल्ह्यातील रामटेक येथे मुंबईसारखी चित्रपटनगरी येथेही बांधले पाहिजे, असा राज्य सरकारचा विचार आहे. या चित्रनगरीचे स्वप्न आकार घेण्याच्या मार्गावर आहे. रामटेकमधील खिंडसी तलावाजवळ ही फिल्म सिटी बांधली जाणार आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे.

सांस्कृतिक कार्य यांनी रामटेक येथील नियोजित फिल्म सिटीसाठी महसूल विभागाकडून सांस्कृतिक विभागाला तात्काळ 128 एकर जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ही चित्रनागरी बांधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक विभागाने या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरी परिसराच्या आढावा बैठकीत शेलार बोलत होते.

आशिष शेलार यांनी सांगितले की, रामटेक येथील खिंडसी तलावाजवळील जागा चित्रीकरण व इतर बाबींसाठी योग्य असून, हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल. चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Kalki 2898 AD Television Premiere Date: ब्लॉकबस्टर चित्रपट 'कल्की 2898 एडी' या दिवशी टीव्हीवर येणार, जाणून घ्या तारीख आणि वेळ)

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या 40 किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.