Chicken Found Dead In Maharashtra: कोंबडी मरण्याचे सत्र महाराष्ट्रात सुरुच, लातूरमध्ये 350 कोंबड्या ठार; अनेकांना सतावतोयत Bird Flu संसर्गाचा धोका
Chicken In Maharashtra | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

एका बाजूला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका कायम असताना राज्यात बर्ड फ्लूची भीती वाढते आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) संसर्गाचा धोका वाढताना दिसतो आहे. त्यासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे (Chicken Found Dead In Maharashtra) प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत परभणी (Parbhani), अमरावती (Amravati), लातूर (Latur), नाशिक (Nashik) अशा विविध ठिकाणी कोंबड्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये सतर्कता वाढताना दिसत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यातच 350 ते 400 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

लातूर- 350 कोंबड्यांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातही अज्ञात अजाराने कोंबड्या मृत्यूंची घटना घडली आहे. ही घटना केंद्रेवाडी येथील पोल्ट्र फॉर्ममध्ये घडली. येथील पोल्ट्री फॉर्ममधील 350 ते 400 कोंबड्या मृत झाल्या. मात्र, त्या कोणत्या कारणामुळे मृत झाल्या याबाबत मात्र खुलासा होऊ शकला नाही. (हेही वाचा, Satara: कराड तालुक्यात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात; 600 कोंबड्यांचा मृत्यू)

परभणी- 900 कोंबड्या मृत

परभणी जिल्ह्यातही कोंबड्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. परभणीत शनिवारी (9 जानेवारी) एकाच दिवसात सुमारे 900 कोंबड्या मृत झाल्या. परभणी येथील मुरुंबा गावात ही घटना घडली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत झाल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. बर्ड फ्ल्यूचा धोका विचारात घेऊन सध्या येथील कोंबड्यांची विक्री थांविण्यात आली आहे.

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 28 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बडनेऱ्यातील दत्तवाडी परिसरात ही घटना घडली. या सर्व कोंबड्यांचे शवविच्छेदन होणार आहे.प्राप्त माहितीनुसार मृत पावलेल्या कोंबड्या उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरामले यांच्या मालकीच्या आहेत. या कोंबड्या चरत असतानाच त्या जमिनीवर अचानक कोसळल्या आणि गतप्राण झाल्या. या घटनेनंतर बडनेरा पशुवैद्यकीय दवाखान्यास याबाबत माहिती देण्यात आली.

एकाच वेळी अज्ञात कारणांमुळे मृत्यू पावणाऱ्या कोंबड्यांची संख्या मोठी आहे. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या पशूवैद्यकीय विभागाने वेळच या घटनेची नोंद घेऊन उपाययोजना करायला हव्यात. तसेच, कोंबड्या मृत होण्याचे कारण शोधून काढायला हवे, अशी मागणी होत आहे.