
Satara: सातारा जिल्ह्यात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात (Tempo Accident) झाला. या अपघातात 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे ही घटना घडली. सुदैवाने टेम्पो चालकाला कोणतीही दुखावत झाली नाही. परंतु, सहाशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.
प्राप्त माहितीनुसार, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. कराड -ढेबेवाडी रस्त्यावर टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक करण्यात येत होती. यावेळी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटला. परिणामी टेम्पोतील तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. (हेही वाचा - पुणे: पत्नीला खुश ठेवण्यासाठी चोरीचा धंदा; मोबाईल, साड्या, ड्रेस चोरी करणाऱ्या 21 वर्षीय आरोपीला अटक)
दरम्यान, नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू केलं. टेम्पोमधून चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. परंतु, या अपघातात 600 कोंबड्याचा जीव गेला. गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील बडवानी भागात कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला होता. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तसेच यातील अनेक नागरिकांनी अपघातग्रस्तांची मदत करण्याऐवजी टेम्पोतील कोंबड्या पळवून नेल्या होत्या.
या अपघातात ट्रकमधील सुमारे 500 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. तसेच उरलेल्या 400 ते 500 कोंबड्या नागरिकांनी लंपास केल्या होत्या. हा ट्रक महाराष्ट्रातील मालेगावहून खिलचीपूरला जात होता. मात्र, कुशलगड राज्य महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झाला होता. ट्रक समोर अचानक गाय आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.