Chhatrapati Shivaji Maharaj's Wagh Nakh (PC - Twitter/@MeghUpdates)

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh:   छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अजरामर आहे. शिवरायांच्या कथा आजही प्रशासकीय सेवेसाठी आदर्श आणि सामान्यांसाठी त्यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे. महाराजांचे गडकिल्ले, युद्ध मोहिमा त्यांची दुरदुष्टी दाखवते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या पहिल्या मराठा छत्रपती अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणार्‍या अनेक गोष्टी पाहण्यासाठी लोकांची गर्दी पहायला मिळते. मागील वर्षीच महाराष्ट्र सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. ही वाघनखं शिवकालीन आहेत. सध्या महाराष्ट्रामध्येच ही वाघनघं सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

वाघनखं का आहेत खास?

प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरली होती. भेटीचं निमित्त साधून शिवरायांवर हल्ला करण्याचा अफजल खानाचा कट महाराजांनी त्याच्यावरच उलटवला होता. यावेळी शिवरायांना वाचवणारी वाघनखं नेमकी कशी होती? ही आता प्रत्यक्ष लोकांना पाहता येणार आहे. दरम्यान ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का? याचा मात्र पुरावा नाही. त्यामुळे यावरून ही नखं शिवरायांची आहेत? की शिवकालीन आहेत? हा वाद आहे.  Shivaji Maharaj Death Anniversary: शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारात या '8' व्यक्तींकडे होती महत्त्वाची जबाबदारी!

सध्या महाराष्ट्रात ही वाघनखं कुठे बघायला मिळतील?

शिवकालीन वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणल्यानंतर आता ती स्वराज्याची राजधानी शहर सातारा, नंतर नागपूर, कोल्हापूर आणि शेवटी मुंबई मध्ये विशिष्ट महिन्यांसाठी बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्रात ही वाघनखं संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. सध्या ही वाघनखं नागपूर मध्ये संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

पुरातत्व विभाग व राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानूसार शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे सातऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

मध्यवर्ती संग्रहालय नागपूर

नागपूर मध्यवर्ती संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे.डायनासोरचे जीवाश्म, नाणी, प्राचीन शिलालेख, शिल्पे, शस्त्रे, प्रति-ऐतिहासिक ते आधुनिक काळापर्यंतच्या आदिवासी कलाकृती यासारख्या महत्त्वाच्या कलाकृती इथे पहायला मिळतात. सध्या इथे खास लंडन वरून आणण्यात आलेली वाघनखं बघायला मिळणार आहेत. या संग्रहालयाला भेट देण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आहे. हे संग्रहालय सोमवारी बंद असते.