Chhatrapati Shivaji Maharaj's Death Anniversary: महाराष्ट्रातील नव्हे तर देशाभरातील जनतेच्या मनात अढळ स्थान असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 साली अखेरचा श्वास घेतला. या दिवशी संपूर्ण सृष्टीवर शोककळा पसरली. रायगड दुःखाने काळवंडला. अवघ्या 50 व्या वर्षी महाराजांनी जगाचा निरोप घेतला.
पण सुराज्य, स्वराज्य यांची नांदी नेमकी महाराजांनी कशी साधली? तर त्यासाठी त्यांचे प्रभावशाली आणि प्रतिभासंपन्न अष्टप्रधान मंडळ कार्यरत होते. अष्टप्रधान मंडळाच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि पारदर्शी कारभारामुळे स्वराज्याची घडी नीट बसली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक नजर टाकूया त्यांच्या अष्टप्रधान मंडळाच्या स्वरुपाकडे...
प्रधानमंत्री
महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. अष्टमंडळातील प्रधानमंत्रींना सर्वात महत्त्वाचे स्थान होते. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. हाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. शिवाजी महाराजांच्या वेळी मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे प्रधानमंत्री होते.
अमात्य
अमात्य हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ अर्थमंत्री असा आहे. रामचंद्र निळकंठ हे शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळाचे अर्थमंत्री होते. स्वराज्याचा सर्व खर्च, जमाखर्च पाहण्याचे काम अमात्यांचे असायचे.
पंत सचिव (सुरनीस)
अण्णाजीपंत दत्तो हे शिवाजी महराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंत सचिव होते. पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे प्रमुख काम होते. शिवाजी महाराज जो काही पत्रव्यवहार, आज्ञापत्रे लिहित त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. तसेच त्यांना जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागे.
मंत्री (वाकनीस)
महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम वाकनीस करत असतं. दत्ताजीपंत त्रिंबक हे शिवाजी महाराजांचे वाकनीस होते. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे ते करत असतं.
सेनापती (सरनौबत)
शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. हंबीरराव मोहिते हे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे सेनापती होते.
पंत सुमंत (डबीर)
स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री पंत सुमंत होते. महारांजांच्या काळात ही जबाबदारी रामचंद्र त्रिंबक सांभाळत होते. परराष्ट्रांची संवाद साधणे, त्यांचे स्वागत-सत्कार करणे, विदेशी दूतांची व्यवस्था पाहणे अशी कामे ते करत. त्याचबरोबर परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे. तसेच परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम पंत सुमंत यांच्यावर होते.
न्यायाधीश
दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय मिळवून देण्याचे काम न्यायाधीश करत असतं. निराजीपंत रावजी हे महाराजांच्या स्वराज्याचे न्यायाधीश होते.
पंडितराव
धर्मखात्याच्या प्रमुखांना पंडितराव म्हटले जाई. मोरेश्वर पंडित हे स्वराज्याचे पंडितराव होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, अशी कामे ते करत असतं.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची नीटनेटकी रचना पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा का म्हटले जाई, याची प्रचिती येते.