आग्रा किल्ला (Agra Fort) येथे 'दिवाण-ए-आम'मध्ये यंदाची शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023) धुमधडाक्यात साजरी करण्याचा शिवप्रेमींचा मार्ग मोकळा झाला आहे. पुराततत्व खात्याने (Archaeological Survey of India) परवानगी दिल्याने मार्ग मोकळा झाला. शिवजयंती (Shiv Jayanti 2023) 'दिवाण-ए-आम'मध्ये साजरी करण्यास परवानगी द्यायला पुराततत्व खात्याने सुरुवातीला खळखळ केली. मात्र, इतर सांस्कृतीत कार्यक्रम करण्यास विभाग परवानगी देतो. मग, शिवजयंती साजरी करण्यासच विरोध का? असा सवाल उपस्थित करत शिवप्रेमांनी थेट दिल्ली हायकोर्टातच दाद मागितली. दरम्यान, पुराततत्व विभाग राजी झाला असून, त्यांनी शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्यास परवानगी दिली.
विनोद पाटील यांचे अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार अशा संयुक्त विद्यमाने ही शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी होणार आहे. भव्य स्वरुपातील या कार्यक्रमास महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. याशिवाय इतरही अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या)
आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी यासाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान 11 नोव्हेंबर 2022 पासून प्रयत्न करत होते. त्यासाठी पुराततत्व विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतू, पुराततत्व खात्याने आपली नकारघंटा कायम ठेवली. परिणामी दिल्ली हाय कोर्टात दाद मागण्यात आली. पुराततत्व विभागाने या आधी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती. याशिवाय अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी होती. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमास परवानगी नाकारण्याच प्रश्नच उद्भवत नाही, असा शिवप्रेमींचा दावा होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा किल्ल्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. असे असताना परवानगी नाकारण्याचे कारण काय? हा प्रश्न शिवप्रेमिंना सतावत होता. दरम्यान, परवानगी मिळाल्याने आता शिवप्रेमींमध्ये आनंदाचे भरते आले आहे.
औरंगजेब याने छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. औरंगजेब याने छत्रपती आणि युवराजांना मारण्याचा कट योजला होता. मात्र, अत्यंत धाडसी आणि मोठ्या हिकमतीने महाराजांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासात या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. सहाजिकच शिवप्रेमींकडून आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्याचे योजण्यात आले.