Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Chhagan Bhujbal Withdraws Candidacy From Nashik: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यास थेट नकार दिला आहे. महायुतीमध्ये अद्यापही नाशिकच्या जागेवर उमेदवारीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्याउलट विरोधी पक्षांत असलेल्या महाविकासआघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला आणि ते कामलाही लागले. सत्ताधारी पक्षांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आपण नाशिक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत आहोत, असे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय

नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. त्यावरुन अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र, आमच्या पक्षाचे (राष्ट्रवादी काँग्रेस) वरिष्ठ आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत होळीच्या दिवशी एक बैठक झाली. या बैठकीवेळी छगन भुजबळ यांना नाशिक येथून उमेदवारी द्यावी, असा निर्णय झाला. मी स्वत: त्या बैठकीला उपस्थित होतो. असे असतानाही महायुतीने या ठिकाणी कोणताच उमेदवार जाहीर केला नाही. विरोधी पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यांचे उमेदवार प्रचाराला लागून तीन आठवडे उलटून गेले. तरीही अद्याप या जागेवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपण या जागेवरील उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेतो आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. (हेही वाचा, Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, कुटुंबीयांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी नोटीस)

नाशिकमध्ये महायुतीची जागा धोक्यात

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला आणि संभाव्य उमेदवारास प्रचारास वेळच मिळाला नाही तर उगाचच या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंब पराभवामध्ये परावर्तीत होऊ शकतो, असा इशाराच भुजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना दिला आहे. (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Lok Sabha Election: आढावा सुरु आहे, जागावाटपानंतर उमेदवार निश्चिती- छगन भुजबळ)

महायुतीमध्ये पेच कायम

हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले आहेत. झालेल्या विविध सर्व्हेंमध्ये गोडसे यांच्याविरोधात जनमताचा रोख असल्याने भाजपने त्यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर ही जागा कोणालाय घ्यायची यावरुन महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. या पेचामुळे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होतो आहे.