Sharad Pawar and Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही. या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता आहे. त्यामुळे आपण आपल्या भेटीसाठी आलो आहे. आपण या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा'', असे आपण शरद पवार यांना सांगिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे सोमवारी (15 जुलै) सकाळी अचानक दाखल झाले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती. राज्याच्या राजकीय वर्तुळातही या भेटीमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी खुलासा केला.

दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर भेट

दरम्यान, भेटीची कोणतीही वेळ न घेता गेल्याने छगन भुजबळ यांना शरद पवार यांची भेट मिळण्यासाठी जवळपास दीड तास प्रतिक्षा करावी लागली. प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर ही भेट झाली. मात्र, नियोजीत दौऱ्यावर निघायचे असल्याने शरद पवार  यांच्यासोबत भुजबळ यांचा संवाद काहीच मिनीटे झाला. त्यानंतर ते सिल्वर ओकवरुन बाहेर पडले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संवाद टाळला होता. अखेर त्यांनी आपली भूमिका आणि भेटीबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. (हेही वाचा, Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: छगन भुजबळ सिल्वर ओकवर दाखल, शरद पवार यांच्या अचानक भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)

दीड तास चर्चा झाल्याचा छगन भुजबळ यांचा दावा

शरद पवार यांना भेटण्यासाठी मी आज गेलो होतो. त्यांच्या भेटीची कोणतीही वेळ मी घेतली नव्हती. फक्त ते घरी असल्याचे मला समजले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. ते विश्रांती घेत होते. त्यामुळे मी थोडा वेळ त्यांची वाट पाहात थांबलो. थोड्या वेळांनी त्यांनी मला बोलावले. मग आमच्यात जवळपास दीड-तास चर्चा झाली. मी त्यांना सांगितले की, मी राजकारण घेऊन आपल्याकडे आलो नाही. मंत्री, आमदार, राजकीय नेता म्हणून तर मुळीच नाही. फक्त मी आलो आहे सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी, असे आपण पवार यांना सांगितल्याचे भुजबळ या वेळी म्हणाले.  (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी)

काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती

ओबीसी आरक्षण राबविण्याचे मोठे काम आपण केले आहे. मात्र, आज राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर वाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक आपल्या जाती वगळता वेगळ्या जातीच्या हॉटेल, कार्यालयांमध्ये जायला तयार नाहीत. जात नाहीत. त्यामुळे हा संघर्ष मिटीविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आपण (शरद पवार) राज्यातील प्रमुख आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही या प्रश्नात पुढाकार घ्यायला हवा. आपण बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपण सरकारचे काय होईल, याचा विचार केला नाही. आताही आपण अशीच भूमिका घ्यायला हवी, असे भूजबळ यांनी म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election: लोकसभा झाली आता विधानसभेची तयारी; महाविकासाघाडीमध्ये जागावाटपावरुन स्पर्धा; कोणाला किती जागा?)

शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

माझे सर्व ऐकूण घेतल्यानंतर शरद पवार यांनी सांगितले की, राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांशी चर्चा करताना काय सांगितले, कोणती आश्वासने दिली. कणत्या मुद्द्यावर आंदोलने मागे घेतली गेली, हे आम्हाला काहीही माहिती नाही. त्यामुळे ऐनवेळी जर विरोधकांना चर्चेला या म्हटले तर विरोधकांनी कसे आणि कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी यायचे? अशा प्रकारच्या ज्वलंत मुद्द्यांवर इतक्या लोकांसोबत चर्चा होत नाही, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

राहुल गांधी यांनाही भेटण्यास तयार

छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना म्हटले की, राज्यासमोर सध्या सुरु असलेला आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. त्यांमुळे हा मुद्दा सोडविण्यासाठी मी कोणासही भेटायला तयार आहे. अगदी राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करण्यास आमची तयारी आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. मला राजकारण, मंत्रिपद, आमारकी हे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. माझ्यासाठी समाजातील एकोपा हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही भुजबळ म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी शरद पवार यांची तयारी

शरद पवार यांनी आपले सर्व मुद्दे ऐकूण घेतले. सध्या त्यांची प्रकृती ठिक नाही. ते विश्रांती घेत आहेत. आपले बोलणे ऐकल्यावर त्यांनी पुढच्या एक दोन दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही भुजबळ म्हणाले.