Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईतील गुन्हे शाखा आणि मिलिट्री इंटेलिजन्स यांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका अभियानाअंतर्गत एक अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला आहे. कारवाई करण्यात आलेले टेलिफोन एक्सचेंज हे गोवंडी स्थित होते. गुन्हे शाखेकडून असे सांगण्यात आले आहे की, चार सिम बॉक्सचा वापर करुन अनधिकृतपणे टेलिफोन एक्सचेंज चालवण्यात येत होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी 191 सिम कार्ड जप्त केले आहेत. त्यापैकी 72 सिम कार्डचा उपयोग करण्यात येत असून अन्य 119 सिम कार्ड बॅकअप म्हणून ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी या प्रकरणी पुढे असे सांगितले की, या अनधिकृत टेलिफोन एक्सजेंच्या माध्यमातून जम्मू कश्मीर मधील सुरक्षा-सैन्य दलासंबंधित माहिती देण्यात येत असल्याचे समोर आले. त्याचसोबत नेपाळ आणि आखाती देशासोबत सुद्धा संबंध असल्याचे समोर आले असून त्याबाबत चौकशी केली जात आहे. आतापर्यंत एका व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त संतोश रस्तोगी यांनी दिली आहे. रस्तोगी यांनी असे म्हटले की, पाकिस्तानशी संबंधित असलेले हे हेरगिरी करणारे नेटवर्क असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(बनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा आता NIA यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.