बनावट E-Pass ला बळी पडू नका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्या- मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या (Lockdown) चौथ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, त्यासाठी ई-पासचे (E-Pass) बंधन घालण्यात आले. मात्र आपत्कालीन परिस्थितीतच हे ई-पास देण्यात येत होते. तसंच त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अपुऱ्या माहिती अभावी काही प्रवासी बनावट ई-पासला बळी पडत आहेत. त्यामुळेच बनावट ई-पास रॅकेटला आळा घालण्यासाठी मुंबईच्या डोंगरी परिसरातील झोन-1 चे डिसीपी संग्रामसिंह निशाणदार (Sangramsingh Nishandar) यांनी मुंबईकरांना विशेष आवाहन केले आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून ई-पास बनवून घेऊ नका. तुमच्या जवळील स्थानिक पोलिस स्टेशन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच ई-पास घ्यावा, असे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला सतर्क केले आहे. यात त्यांनी बनावट ई-पास रॅकेटला बळी पडू नका, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. ई-पास मिळवण्यासाठी Covid19.mhpolice.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेथे तुमची सर्व माहिती भरुन आवश्यक ती कागदपत्रे जोडून सब्मिट करा. त्यानंतर तुमच्या माहितीची पडताळणी करुन तुम्हाला ई-पास देण्यात येईल. (लॉकडाउनच्या काळात आपात्कालीन प्रवासासाठी E-Pass कसा मिळवायचा? सविस्तर माहिती घ्या जाणून)

Mumbai Police Tweet:

कोविड-19 लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध ठिकाणी अडलेले नागरिक मूळ ठिकाणी परतण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थिती ई-पास मिळवण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यास चुकीच्या किंवा अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून ई-पास मिळवला जातो. परंतु, नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे सतर्कतेचे आवाहन केले आहे.