पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून दुष्काळाच्या प्रश्नावर लढण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करेल. दुष्काळाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार जे काही पाऊल उचलेल त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात ते शुक्रवारी (१९ ऑक्टोंबर) बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार उपक्रमांच्या माध्यमातून सुरु केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. जलयुक्त शिवार उपक्रमाअंतर्गत १६ हजार गावे दुष्काळमुक्त केली. लोकसहभागातूनही अनेक चांगले उत्कृष्ट उपक्रम महाराष्ट्राने सुरु केले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस सरकारचे कौतुक केले.
भाषणाची सुरवात मराठीतून करत मनं जिंकण्याचा प्रयत्न
दरम्यान, ओम साई... साईबाबांच्या या पवित्र भूमीवर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. साईबाबांच्या कृपेने आपल्या सर्वांना भेटण्याचा योग आला याबात मी खूप आनंदी आहे, असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्नही केला. या वेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, साईंचं दर्शन घेऊन फार आनंद वाटला. आपल्याला मिळालेले घर आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरेल. घर हे आपल्या स्वप्नांना आकार देते. गरीबीशी लढण्याचे बळ देते. भाारताच्या स्वातंत्र्याल ७५ वर्ष होतील तोपर्यंत देशातील सर्व बेघरांना घर देण्याचे आमचे स्वप्न आहे. झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना पक्क्या घरांमध्ये परावर्तीत करण्यासाठी सरकार काम करत आहे, असे मोदी या वेळी म्हणाले. (हेही वाचा, दुष्काळाशी लढण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राच्या पाठी उभे राहावे - मुख्यमंत्री)
गांधी कुटुंबावरुन काँग्रेसला टोला
पुढे बोलताना, बेघरांना घरे देण्याचे काम यापूर्वीही झाले. पण, ते सर्व प्रयत्न एका विशेष कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन करण्यात आले. ती घरे या घराचा उदो उदो करण्यासाठीच तयार करण्यात आली, असा टोला पंतप्रधान मोदींनी गांधी घराण्याचा उल्लेख न करता काँग्रेसला लगावला. पहिल्या सरकारमध्ये एक घर बनविण्यासाठी तब्बल दीड वर्ष लागायचे. हे सरकार केवळ एक वर्ष किंवा त्याहून कमी वेळेत तयार करत आहे. या सरकारने घरांचा आकारही मोठा केला. तसेच, त्याला लागणारा निधीही वाढवला. हा निधी थेट लाभधारकाच्या बँक खात्यावर जमा होईल याकडे सरकारचे लक्ष आहे आहे. वेगाने काम करणारे हे सरकार आहे, म्हणूनच हे शक्य झाल्याचेही मोदींनी या वेळी सांगितले.