मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Photo Credit: facebook , devendra.fadnavis)

यंदा महाराष्ट्रावर निसर्गाची कृपा म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात ते शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) बोलत होते. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थीत आहेत.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, २२१ तालुक्यांत पाणी नाही. यंदा निसर्गाची कृपा महाराष्ट्रावर नाही. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासठी केंद्र सरकारने राज्याच्या पाठी उभे राहावे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम सुरु आहे. ते काम आम्ही पूर्ण करु. तीन वर्षात ६० लाख शौचालय बांधून आम्ही महाराष्ट्राला हागणदारीमुक्त केले आहे. २०१९मध्ये बेघरांना घरे देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आम्ही पूर्ण करु, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, तिजोरीत खडखडाट तरीही, मोदींच्या कार्यक्रमासाठी २ कोटींचा चुराडा करण्याचा राज्य सरकारचा घाट)

गरीबी हटाओ घोषणा अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत. मात्र, गरीबी हटावचे सर्वात मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. गोरगरीबांना घरे दिली, सिलेंडर दिले, शेतकऱ्यांसाठी मदत केली, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, याच कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सर्वांना उत्सुकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची. कारण  काल (गुरुवार, १८ ऑक्टोबर) दसऱ्या दिवशी मुंबईत झालेल्या शिवसेना दसरा मेळावा तसेच, नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याबाबत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नागपूपर येथील आरएसएसच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा करावा असे म्हटले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेले साडेचार वर्षे आयोध्येत एकदाही का गेले नाहीत? असा सवाल उद्धव यांनी शिवाजी पार्कवरील मैदानातील मेळाव्यातून विचारला होता.