पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

महसूली तूट, राज्यावर चढणारा कर्जाचा बोजा त्यामुळे तिजोरीत असलेला खडखडाट, दुष्काळ, पाणीटंचाई, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची कमतरता, असे महाराष्ट्राचे सध्याचे एकूण चित्र. पण, असे असले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल २ कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असून, तीव्र शब्दात टीका सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी येथे कार्यक्रम पार पडणार आहे. याच कार्यक्रमासाठी राज्य सरकार सरकारी तिजोरीतून इतकी मोठी रक्कम खर्च करणार असल्याचे वृत्त आहे.

कार्यक्रमासाठी गर्दी जमविन्याचे मोठे आव्हान..

दरम्यान, येत्या १९ ऑक्टोबरला पंतप्रधान आवास योजनेच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमासाठी मोदी शिर्डीला येत आहेत. या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र भाजप आणि मुख्यमंत्र्यासमोर आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शन व्हावे, यासाठी महाराष्ट्र भाजप कामाला लागले असून, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांना चहा, नाश्ता, येणे-जाणे आणि बसवर बॅनर लावण्याची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च राज्याच्या तिजोरीतून केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ४० हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी सुमारे २० हजार घरकुल लाभार्थींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुमारे ८०० बसमधून ४० हजार लोक 

'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तात या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे ८०० बसमधून ४० हजार लोक कार्यक्रमस्थळी येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, याच वृत्तात दिलेल्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नाशिकमधील २० हजार लाभार्थ्यांसाठी ४०० बस, अहमदनगर मधील १२ हजार लाभार्थ्यांसाठी २४० बस, औरंगाबाद येथील सुमारे ४ हजार लाभार्थ्यांसाठी ८० बस, बीड येथील २ हजार लाभार्थ्यांसाठी ४० बस, पुणे २ हजार लाभार्थ्यांसाठी ४० पस पाठविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, 'जलयुक्त 'शिव्या'र'; देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी योजनेवरुन राज ठाकरेंचे फटकारे)

विरोधकांची टीका

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. 'राज्य दुष्काळात होरपळत आहे, तिजोरीत खडखडाट आहे आणि राज्य कर्जबाजारी झाले असतांना नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमा करण्यासाठी शासकीय तिजोरीतून 2 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने माणसे आणावी लागत आहेत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.