महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून केंद्र आणि राज्य सरकारवर 'दे दणादण' टीकास्त्र सुरु केले आहे. या टीकेसाठी राज हे स्वत:तील व्यंगचित्रकाराचा पुरेपूर वापर करत आहेत. सरकारचे वाभाडे काढणारे बोलके चित्र आणि त्यावर तितकीच घायाळ करणारी बोचरी पंचलाईन, असे चित्राचे स्वरुप असते. रडारवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या राज ठाकरे यांच्या कुंचल्याचे फटकारे बसत आहेत. राज यांनी 'मुख्यमंत्र्यांचा राजकीय दुष्काळ' या शिर्षाकाखाली नुकतेच एक व्यंगचित्र रेखाटले होते. त्यात यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत टीका केली होती. दरम्यान, राज यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. या वेळी राज यांनी 'जलयुक्त शिवार' या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.
व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी जणू महाराष्ट्रातील जनतेची भावनाच बोलून दाखवली आहे. जलयुक्त शिवार योजनेत सुमारे एक लाख पंचवीस हजार विहीरी बांधल्याचा दावा फडणवीस सरकार करते. तसेच, जलयुक्त शिवार ही योजनाही मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. दरम्यान, राज यांनी आपल्या खास शैलीचा वापर करत याच योजनेवरुन व्यंगचित्र काढले आहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात जनता एका विहिरीत उभी आहे. ज्या विहिरीत राज्यातील जनतेच्या समस्या दिसत आहे. राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे अवघे राज्य तहानलेले आहे. जनतेच्या मनात संताप आहे. सरकार मात्र, काठावर बसून जनतेची मजा पाहात आहे, असेच राज यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगायचे असावे. (हेही वाचा, राज ठाकरेंनी रेखाटला 'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ'; देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नांना व्यंगचित्राची टाचणी
#Maharashtra #drought #JalyuktaShivar #devendraFadnvis pic.twitter.com/onh5WjglGF
— Raj Thackeray (@RajThackeray) October 15, 2018
राज यांनी रेखाटलेले चित्र बारकाईने पाहिल्यास त्यातील सरकारवरीच टीका किती बोलकी आणि सखोल आहे हेही पहायला मिळते. जनता समस्यांच्या विहीरीत उभी आहे. सरकार काठावरन पाहात आहे. दरम्यान, काठावरुन पाहणाऱ्या सरकारच्या रुपात देवेंद्र फडणवीस प्रमुख दिसतात. तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी साम्य दाखवणऱ्या व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव पाहण्यासारखे आहेत. तसेच, बाजूला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या व्यक्तिरेखांचे भावही मजेशीर आहे. दरम्यान, अत्यंत बोलक्या असलेल्या या व्यंगचित्रात राज यांनी 'जलयुक्त शिवार' या शब्दांवर शब्दचमत्कृती साधत 'जलयुक्त 'शिव्या'रं' असे करत जोरदार सणसणीच टोला लगावला आहे. सोशल मीडियात हे व्यंगचित्र नेहमीप्रमाणेच जोरदार व्हायरल झाले आहे.