महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून 'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ' रेखाटला आहे. 'राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेन', असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य आणि राज्याची विद्यमान स्थिती यावरुन राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. ठाकरे यांच्या इतर व्यंगचित्रांप्रमाणे या व्यंगचित्राचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आपल्या आक्रमक भाषाशैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे एक व्यंगचित्रकारही आहेत. त्यामुळे आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते राज्यातील विविध विषयांवर भाष्य करतात. खास करुन राजकारण हा त्यांच्या व्यंगचित्रांचा प्रमुख विषय. आजपर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकारण्यांना राज यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे लगावले आहेत. आजही त्यांनी 'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ' शिर्षकाखाली रेखाटलेल्या व्यंगचित्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दुष्काळाने भेगाळलेली जमीन. त्यावर आर्थिक डबघाईला आलेली राज्याची नौका. ...आणि या नौकेत लोळत पडलेले राज्यासमोरील आर्थिक प्रश्नाची जराही चिंता नसलेले मुख्यमंत्री, असे दृश्य व्यंगचित्रात पहायला मिळते. दरम्यान, या चित्राच्या तपशीलात गेले की, हेही जाणवते की, आर्थिक डबघाईला आलेल्या नौकेत मुख्यमंत्री आपल्या राजकीय भविष्याची स्वप्ने पाहण्यात मश्गुल आहेत. तर, बाजूला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्तिमत्व गोंधळलेल्या स्थितीत तणावग्रस्त भाव चेहऱ्यावर घेऊन उभे आहे. कोपऱ्यात 'महाराष्ट्राच्या २०१ तालुक्यांत पाऊस नसल्याने खरीपासोबत रब्बी हंगामही वाया जाणार', असा इशारा देणारी बातमी लक्ष वेधते.
दरम्यान, वरील चित्रात दिसणाऱ्या एकूण प्रसंगात महाराष्ट्राच्या जनतेचा प्रतिनिधी वाटावा असा एक सामान्य माणूसही ठाकरे यांनी रेखाटला आहे. हा सामान्य माणूस 'परंतू, देवेंद्रजी पुन्हा लाट येईल असे वाटत नाही' असे स्वप्नात मश्गुल असलेल्या मुख्यमंत्र्यांना सांगतो आहे. हीच या व्यंगचित्रातील मेख आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच होणार असे वक्तव्य केले होते. त्यावरुन हा सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्र्यांना सुनावतो आहे.
#Devendrafadnvis #Maharashtra #drought pic.twitter.com/ILEHrDD64F
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2018
दरम्यान, राज ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र मजेशीर असले तरी, ते तितकेच उपहासात्मक आणि राज्यासमोरील भविष्यातील आव्हाने किती गंभीर आहेत हे दाखवणारेही आहे. त्यामुळे व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लक्ष वेधलेल्या मुद्द्यांकडे सरकार गाभीर्याने पाहणार की, त्यावर एखादी राजकीय प्रतिक्रिया देऊन विषय सोडणार याबाबत उत्सुकता आहे.